Power Cut Pudhari
हिंगोली

एप्रिलमध्येच भारनियमनाचा विक्रम; मे महिन्यातील भीषणतेने नागरिक हादरले

Hingoli News | वीज नेमकी कधी येईल याची साधी माहितीही उपकेंद्रातील ऑपरेटर्सकडे उपलब्ध नसते

पुढारी वृत्तसेवा

जवळाबाजार: हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जवळाबाजार परिसरात सध्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. एप्रिल महिन्यातच वीज कपातीचे नवनवे विक्रम प्रस्थापित होत असल्याने, आगामी मे महिन्यातील रखरखत्या उन्हात जनतेचे हाल होणार का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नियोजनशून्य कारभाराचा फटका

मिळालेल्या माहितीनुसार, जवळाबाजार उपकेंद्रामध्ये सध्या नवीन अभियंता आणि नवीन कर्मचारी वर्ग रुजू झाला आहे. मात्र, या नवीन पथकाकडून उपकेंद्रातील कामांचे आणि गावातील डीपी दुरुस्तीचे योग्य नियोजन होत नसल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेष म्हणजे, वीज नेमकी कधी येईल याची साधी माहितीही उपकेंद्रातील ऑपरेटर्सकडे उपलब्ध नसते.

तापमान ४२ अंशांवर; पंखे, कुलर केवळ शोभेच्या वस्तू

मागील आठ दिवसांपासून परिसराचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. अशा परिस्थितीत भर दुपारी तांत्रिक कामाचे कारण सांगून तासनतास वीज कापली जात आहे. यामुळे:

  • घरातील पंखे, कुलर आणि एसी केवळ 'शोभेच्या वस्तू' बनल्या आहेत.

  • लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना या उष्णतेचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

  • व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही याचा विपरीत परिणाम होत आहे.

राजकीय 'बालेकिल्ल्या'ला उतरती कळा?

जवळाबाजार परिसर हा विविध राजकीय पक्षांमधील दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, महावितरणच्या या ढिसाळ कारभाराकडे राजकीय मंडळींचे होत असलेले दुर्लक्ष सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. राजकारणात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या भागातच जनतेचे इतके हाल होत असल्याने, या बालेकिल्ल्याला आता 'उतरती कळा' लागली आहे का, अशी टीका नागरिक करत आहेत.

नागरिकांची मागणी

जर एप्रिलमध्येच ही स्थिती असेल, तर मृग नक्षत्रापर्यंत (पुढील दीड महिना) नागरिकांनी जगायचे कसे? महावितरणने तातडीने सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक पातळीवर दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT