हिंगोली ः औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली असून याप्रकरणी वाहन चालकांवर औंढा पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यातून वाळू घाटावरून मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अवैधरीत्या होणारी वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस विभागाची पथके कार्यरत करण्यात आली आहेत. महसूल पथकासोबतच पोलिस पथकाला ही सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान वाळू घाटाच्या मार्गावर वेळोवेळी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यानुसार औंढा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, उपनिरीक्षक शेख खुदुस, जमादार इकबाल शेख, शेख इमरान, रवीकांत हरकळ, संदीप टाक यांच्या पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली होती. यामध्ये असोला ते कोंडशी मार्गावर असोला शिवारात पोलिसांनी एक ट्रॅक्टर थांबवला असता चालकाने ट्रॅक्टर सोडून पळ काढला. पोलिसांनी ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिसांनी सदर ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाण्यात आणून उभे केले.
अन्य एका कारवाई मध्ये औंढा येथील उप बाजार समितीच्या आवारामध्ये एका टिप्परमध्ये वाळू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता टिप्पर चालक टिप्पर सोडून पळून गेला. या टिप्परमध्येही वाळू आढळून आली पोलिसांनी सदर जप्त करून पोलिस ठाण्यात आणला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चालकाचा शोध सुरू केला आहे.