Aungha Nagnath Illegal Liquor Seized
औंढा नागनाथ : तालुक्यातील उखळी गावात पोलिसांनी अवैध देशी दारू साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.४) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास गावात संशयास्पद कार (क्रमांक MH05 AB 6545) येताच ग्रामस्थांनी ती अडवून घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना दिली.
पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार गजानन गिरी आणि शिपाई राजकुमार कुटे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान कारमधून देशी दारूचे बॉक्स आढळले. पोलिसांनी एकूण 1,78,220 किमतींचा मुद्देमाल जप्त केला. ज्यात दारूच्या बाटल्या आणि कारचा समावेश आहे,
या कारवाईत ज्ञानेश्वर मधुकर जाधव आणि रवीकुमार मारोती सानप या दोघांविरुद्ध औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद शिपाई राजकुमार कुटे यांनी दिली आहे.
उखळी ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे ही कारवाई शक्य झाली असली तरी, औंढा तालुक्यातील सालणा, गोजेगाव, धार, माथा, सिद्धेश्वर, सावळी, गोळेगाव, येहळेगाव, पिंपळदरी आणि जामगव्हाण या गावांमध्ये अवैध दारू विक्री अद्याप सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर पोलिसांचे नियंत्रण अजूनही प्रभावीपणे येणे बाकी आहे.