वसमत येथे पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मारहाण करण्यात आली.  Pudhari Photo
हिंगोली

वसमत येथे पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मारहाण

Hingoli Wasmat news | कर्मचारी संघटनेने तहसीलदारांना निवेदन

पुढारी वृत्तसेवा

वसमत: पुढारी वृत्तसेवा: येथील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यास मारहाण झाल्याची घटना आज (दि.29) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. अधिकार्‍यांसह कर्मचारी वसमत पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. दुसरीकडे कर्मचारी संघटनेने तहसीलदार शारदा दळवी यांची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

वसमत येथे पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या ठिकाणावरून सिध्देश्वर व येलदरी धरणाच्या पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. या शिवाय कार्यालयांतर्गत येणार्‍या तलावांची दुरुस्ती व इतर व्यवस्थापनाचे कामही केले जाते. कार्यालयात इतर अधिकारी व कर्मचारी असा सुमारे 40 ते 50 जणांचा स्टाफ आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार हे त्यांच्या शासकीय निवासस्थानातून कार्यालयामध्ये पायी जात असताना एका व्यक्तीने त्यांना थांबवून शिवीगाळ केली. मात्र, बिराजदार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर संतापलेल्या व्यक्तीने बिराजदार यांना मारहाण केली. त्यानंतर तेथून काढता पाय घेतला.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी बिराजदार यांच्यासह वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांनी तातडीने एक पोलिस पथक संबंधित व्यक्तीच्या शोधासाठी रवाना केले आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, माहिती अधिकारात माहिती देण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याचा प्रकार असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे मागण्यांची निवेदन सादर केले. यामध्ये कार्यकारी अभियंता बिराजदार यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT