भिमराव बोखारे
वसमत: तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथील मंदिरात परिसरातील चार जिल्ह्यातील सुमारे 50 हजारपेक्षा अधिक बैलजोड्या मंदिरात दर्शन व प्रदक्षिणा घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि.२२) मध्यरात्रीपासून वसमत ते औंढा नागनाथ वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथील गोरक्षनाथ मंदिरात पोळा सणाच्या दुसर्या दिवशी असलेल्या कर सणाच्या दिवशी दर्शनासाठी व प्रदक्षिणा घेण्यासाठी हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील शेतकरी बैलजोड्या आणतात. या ठिकाणी बैलजोड्या दर्शनासाठी व प्रदक्षिणा घेण्यासाठी आणल्या नंतर वर्षभर बैलजोड्या आजारी पडत नाहीत, अशी आख्यायिका आहे. यावर्षी या ठिकाणी सुमारे 50 हजार बैलजोड्या येण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, सणानिमित्त वाई येथे बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणार्या पशुपालकांची मोठी गर्दी होते. वसमत ते औंढा नागनाथ हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने या रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वसमत टी पॉईंट ते नागेशवाडीपर्यंत रहदारीचा रस्ता शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवारी मध्यरात्री पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कालावधीत नांदेडकडून औंढा नागनाथकडे येणारी वाहने वसमत, झिरो फाटा, हट्टा, जवळा बाजारमार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने छत्रपती संभाजी नगरकडे जातील. तसेच छत्रपती संभाजीनगरकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेश वाडी, जवळा बाजार, हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळवण्यात आली आहे. वाहनधारकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.