हिंगोली

हिंगोली : वाकोडी शिवारातील तरुणाकडून गावठी पिस्तुल, तलवार जप्त

Shambhuraj Pachindre

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात एका तरुणाकडून गावठी पिस्तुल व तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी तालुक्यातील वाकोडी शिवारामध्ये एका तरुणाकडे गावठी पिस्तुल व तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, जमादार, सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, आझम प्यारेवाले, तुषार ठाकरे, विशाल खंडागळे यांच्या पथकाने शुक्रवारी वाकोडी शिवारात भागवत विश्वनाथ जाधव ( रा. वाकोडी) या तरुणाची झडती घेतली.

यामध्ये त्याच्याकडे गावठी पिस्तुल व तलवार आढळून आली. पोलिसांनी भागवत यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिस्टल व तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील एक महिन्यापासून पोलिसांनी शस्त्र बाळगणाऱ्या तरुणांची माहिती घेण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत सहा गावठी पिस्तुल व सुमारे दहा ते बारा तलवारी जप्त केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात गावठी पिस्टल आले कुठून याचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हे शाखेला दिले आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT