आखाडा बाळापूर (ता. कळमनुरी) : भरधाव वेगाने, त्यातही चुकीच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर हिवरा पाटीजवळ रविवारी (दि. 23) रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास एक हृदय हेलावून टाकणारा अपघात घडला. या भीषण दुर्घटनेत मोटरसायकल चालवणारे पती जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पांडुरंग डाखोरे (वय 28, रा. चुचा, ता. हादगाव, जि. नांदेड) हे त्यांची पत्नी शालिनी ज्ञानेश्वर डाखोरे (वय 25) यांच्यासह गणपूर कामठा (जि. नांदेड) येथे एका लग्न समारंभासाठी निघाले होते. त्यांच्या सुखाचा प्रवास सुरू असतानाच, हिवरा पाटी परिसरात अचानक चुकीच्या दिशेने आलेल्या एका ट्रॅक्टरने त्यांच्या MH 26 CL 0034 क्रमांकाच्या मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ज्ञानेश्वर डाखोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी शालिनी डाखोरे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ ॲम्बुलन्सद्वारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, चालक प्रविण चव्हाण, तसेच डोंगरकडा पोलिस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे व विठ्ठल जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला, जिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहसिन खान यांनी शवविच्छेदन केले. ज्ञानेश्वर डाखोरे यांच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. डाखोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा आणि ट्रॅक्टरचा कसून शोध घेत आहेत.