वसमत: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खुदनापूर शिवारात शनिवारी (दि. ४ ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता झालेल्या हृदयद्रावक घटनेत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा ४ एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाला.
खुदनापूर येथील शेतकरी राधाजी चंपती तिडके आणि चंपती मुंजाजी तिडके यांच्या गट क्रमांक ७४ मधील उसाचे पीक तोडणीच्या अगदी तोंडावर असताना विद्युत तारेच्या ठिणग्यांनी भस्मसात झाले. कारखान्यांचा बॉयलर प्रदीपन कार्यक्रम सुरू झाला असताना आणि ऊस तोडणीचा हंगाम लवकरच सुरू होणार असताना, वर्षभर केलेल्या मेहनतीवर शासनाच्या व्यवस्थेमुळे आणि विद्युत महामंडळाच्या कामचुकारपणामुळे पाणी फिरले.
शॉर्टसर्किटमुळे दोन तारांमधून पडलेल्या ठिणग्यांमुळे आग लागली आणि ती इतकी वेगाने पसरली की स्थानिक शेतकरी तिला विझवू शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत ४ एकर ऊस जळून राख झाला. या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेनंतर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने पंचनामे केले आहेत, मात्र ज्यांच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झाले त्या विद्युत महामंडळाचे अधिकारी पंचनाम्यासाठी उशिराने येत असल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये संताप आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, अतिवृष्टी आणि ढगफुटीसारख्या नैसर्गिक संकटांमुळे हळद, कापूस, सोयाबीन या पिकांचे आधीच मोठे नुकसान झाले होते. "एकमेव राहिलेला ऊस शासनाच्या आणि विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे जळून गेला. आता दिवाळी कशी साजरी करावी, वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा आणि मुलांचे शिक्षण कसे करावे," असा सवाल करत त्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, महामंडळाने लोमकाळलेल्या विद्युत तारांची त्वरित दुरुस्ती करावी, जेणेकरून इतर शेतकरी बळीचे बकरे ठरू नयेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.