हिंगोली : सामाजिक व आर्थिक विषमता संपवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य हे जलदगतीने आणि कमी खर्चात व्हावे, असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केला.
आज येथील नवीन स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे व नवीन प्रशस्त न्यायालयीन इमारतीचा लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना भा. वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराधे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, नितीन सांबरे, नितीन सुर्यवंशी, यनशिवराज खोब्रागडे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, मुंबई उच्च न्यायालयाचे 30 ते 35 न्यायमूर्तीं, परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफानसिंग एस. अकाली, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती गवई म्हणाले, स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर आता हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाची सर्व सोयीसुविधांनी युक्त भव्य आणि देखणी अशी उत्कृष्ट इमारत बांधली आहे. अमरावती, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची इमारत स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. या इमारतीतून समाजातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करत समाजातील शेवटच्या नागरिकाला जलदगतीने कमी वेळेत, कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे, असा आशावाद व्यक्त केला.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करताना म्हणाले, ज्या ज्या वेळी या भागात येतो तेव्हा अधिक आपुलकीची भावना निर्माण होते. येथे वडिलांचा नोकरीनिमित्त बराच काळ गेल्याचे सांगत ते जुन्या आठवणीत रमले. न्यायमूर्ती गवई यांची लवकरच देशाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती होणार असून ते देशाची न्यायव्यवस्था समर्थपणे सांभाळतील याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र भूमी ही संत महात्म्याची भूमी म्हणून ओळखली जाते. नवीन इमारतीत न्यायदानाचे काम अधिक प्रभावी व गतिशील होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी व्यक्त केला. पालक न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी नवीन न्यायालयीन इमारत हे आपल्या कार्यक्षमता, न्यायव्यवस्थेच्या शुद्धतेचा पाया आहे. या नवीन इमारतीत न्यायदानाचा गतिशील आदर्श घालवून द्यावा, असे सांगितले.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्वतंत्र हिंगोली न्यायिक जिल्हा झाला आहे. हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा आहे. नवीन इमारत व जिल्हा न्यायालयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास दृढ होत जावो, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सतीश देशमुख यांनी केले. तर शेवटी आभार हिंगोलीचे नव नियुक्त प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफानसिंग अकाली यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय नागरिकांची सनद आणि त्यांचे अधिकार याची माहिती देणारे 'एक मुठ्ठी आसमा हे' नालसा गीत सादर करण्यात आले. उर्मिला जगताप व देवयानी गायकवाड यांनी स्वागत गीत गायिले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर व समाजसेवक मधुकरराव मांजरमकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ताम्हणे, गजानन नंदनवार आणि प्रियंका पमनानी यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.