हिंगोली : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता शिवारात भरधाव ऑटोने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. जखमीला हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील रोहिदास चव्हाण व हिंगोली येथील व्यंकट मुंडे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर कळमनुरीकडे गेले होते. त्या ठिकाणी काम आटोपून ते दोघेही दुचाकीने (एमएच-१४-एई-३३५६) कळमनुरी येथून हिंगोलीकडे येत होते. यावेळी खानापूर चित्ता शिवारात पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ॲटोने (एमएच-३८-ई-३०९३) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच कोसळले. या अपघातानंतर चालकाने ऑटो घटनास्थळी सोडून पळ काढला. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, परिसरातील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच जमादार अनिल डुकरे, किशोर पवार, आकाश पंडीतकर, रमेश जाधव, आशिष उंबरकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे दोघांनाही हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र , व्यंकट मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या अपघातातील गंभीर जखमी रोहिदास चव्हाण यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी अपघातातील ऑटो चालकाचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.