solar grazing policy pudhari photo
हिंगोली

Solar grazing policy : ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सौर चराई धोरण राबवा

विभागीय वन अधिकाऱ्यांचा प्रस्ताव, शासनाकडून निर्णयाची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली :मेंढपाळ अन वन कर्मचारी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर सौर चराई धोरण राबविण्याचा प्रस्ताव विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे यांनी प्रादेशिक वन संरक्षक विभागामार्फत शासनाकडे पाठविला आहे. त्यावर आता शासनाकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

दरवर्षी मेंढपाळ व वन कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष होतो. वनक्षेत्रात मेंढ्या चारण्यासाठी आल्यानंतर हा संघर्ष निर्माण होतो त्यातून हिंसक घटनाही घडल्या आहेत. मागील काही वर्षात गायरान जमीन व इतर शासकिय जमीनी इतर प्रकल्पासाठी संपादित झाल्यामुळे वन जमिनीवर अतिरिक्त परिणाम होत आहे. राज्यात सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे पारंपारीक चराऊ जमीन झपाट्याने कमी होत असून या परिस्थितीत सौर प्रकल्पांमधे मेंढी पालन हि संकल्पना ऊर्जा कंपन्या व स्थानिक मेंढपाळ यांना अत्यंत महत्वाची व फायदेशीर ठरू शकते त्यातून वन जमीनीवरील चराई देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा डॉ. नाळे यांनी केला आहे.

राज्यात सध्याच्या स्थितीत ४० हजार एकर जमीन सौर प्रकल्पासाठी व्यापलेली आहे. पुढील काळात आणखी जमीन लागणार आहे. या प्रकल्प उभारणीनंतर सुरक्षेच्या कारणासाठी तार कुंपन देखील घालण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यात २५.८० लाख मेंढ्या आहेत. राज्यात चराऊ जमीनीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेंढ्यांना सौर प्रकल्पाच्या आत चरू देणे हा दुहेरी फायदा आहे. सौर पॅलन जमीनीपासून सुमारे ३ फुट उंचीवर उभारले जाते. तर मेंढ्यांची उंची कमी असल्याने त्या पॅनलखाली सहज चरू शकतात.

इतर प्राणी आकाराने मोठे असल्याने या ठिकाणी मेंढ्या चारणे अपेक्षीत आहे. तसेच मेंढ्यांचा स्वभाव शांत असून त्या वायर्स कुरतडत नाहीत. तसेच सौर प्रकल्पामध्ये गवत वाढल्यास पॅनल्सवर सावली पडून विज निर्मितीची कार्यक्षमता घटते. त्यामुळे गवत कापण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो. मात्र मेढ्या हे गवत खात असल्याने गवत कापण्याच्या खर्चात बचत होईल. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये सोलर ग्रेझिंग सौर प्रकल्पात मेंढीपालन हा व्यवसाय बनला आहे.

अमेरिकेत सोलार ग्रेझींग असोसिएशन देखील स्थापन झाली असून हि संस्था सौरकंपन्या व मेंढपाळात समन्वय साधण्याचे काम करते. त्याधर्तीवर राज्यात हा प्रयोग करणे अपेक्षीत असल्याचे डॉ. नाळे यांनी प्रस्तावात नमुद केले आहे. सौर प्रकल्पाच्या बंदिस्त कुंपणामुळे लांडगे, बिबट्या या सारख्या हिंस्त्र प्राण्यापासून मेंढ्यांचे संरक्षण होते. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमध्ये सौर पॅनल्समुळे मेंढ्यांना हक्काची सावली मिळते अन त्यांचे तापमान नियंत्रित राहून आरोग्य सुधारते असे प्रस्तावात नमुद केले आहे.

  • पॅनल्सखाली वाढलेले गवत मेंढ्या खातात त्यामुळे गवत कापण्यासाठी लागणारा खर्च वाचतो, वाळलेले गवत मेंढ्यांनी खाल्यामुळे उन्हाळ्यात आगीच्या घटना टाळणे शक्य होते. यंत्राद्वारे गवत कापताना उडणाऱ्या खड्यामुळे पॅनल्स फुटण्याची धोका कमी होतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT