औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील असलेले सिद्धेश्वर धरणा मधून शेतकऱ्याच्या मागणीनंतर पूर्णा मुख्य कालव्यावर अवलंबून असलेला हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाण्याची मागणी केल्यामुळे शनिवारी सिद्धेश्वर धरणातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.
खरिपाची पेरणी केलेल्या पिकासह लाभ क्षेत्रातील बारमाही पिकावर पाण्याअभावी ताण पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी पाठ बंधारे विभागाकडे केली होती त्या अनुषंगाने कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे .मे महिन्याच्या मध्यावधीत सिद्धेश्वर धरणाच्या लाभक्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून मुख्य कालव्यातूनसिंचनासाठी पूर्ण क्षमतेने सुरू असलेले आवर्तन मे महिन्यात 23 तारखेला निरंक करण्यात आले होते.
लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या ऊस, हळद, केळी या पिकांची लागवड व पेरणी केली. जून महिना उघडताच पावसाने उघडीप दिल्यामुळे लागवड केलेल्या पिकावर ताण पडून पीके कोमेजायल सुरुवात झाली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ,वसमत, परभणी व नांदेड जिल्ह्यातील मालेगाव लिमगाव गावातील लागवड केलेल्या पिकांना ऐन पावसाच्या तोंडावर उघडीप दिल्याने शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली होती,पुढील काही दिवस पावसाचा अंदाज नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुर्णा पाटबंधारे विभागाकडे सिंचनासाठी पाण्याची मागणी केली.
त्या अनुषंगाने दिनांक सात जून रोजी सिद्धेश्वर धरणाच्या मुख्य कालव्यामधून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. सिद्धेश्वर धरणात सध्या स्थितीत केवळ 22 टक्के म्हणजे जवळपास 18 दलघमी जिवंत पानी साठा उपलब्ध असून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे दररोज एक दलघमी पाण्याची घट निर्माण होणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात समाधान पूर्वक पाऊस न झाल्यास सिद्धेश्वर धरणाचा पाणीसाठा शून्य टक्के जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.