Sengaon Police Action
सेनगाव: तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीने कळस गाठला असतानाच, पोलिसांनी गुरुवारी रात्री मोठी कारवाई केली. विनापरवाना रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडून पोलिसांनी ७ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १८ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास सेनगाव पोलीस बन फाट्यावर गस्त घालत होते. यावेळी विनाक्रमांक असलेला पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड टिप्पर संशयास्पद रितीने येताना दिसला. पोलिसांनी तो थांबवून झडती घेतली असता, त्यात अंदाजे अडीच ब्रास बेकायदेशीर रेती आढळून आली.
विठ्ठल लिंबाजी नागरे (वय २३, रा. कापडसिंगी, जि. हिंगोली). हा तरुण स्वतःच टिप्परचा मालक व चालक असून, शासनाचा महसूल बुडवून तो बेकायदेशीररीत्या रेतीची वाहतूक करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात सपोनि दीपक मस्के, हवालदार जीवन मस्के, एकनाथ राठोड आणि चालक अंभोरे यांचा समावेश होता.
सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने माफिया दिवसाढवळ्या नदी ओरबाडत आहेत. यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, केवळ छोटे टिप्पर पकडण्यापेक्षा या व्यवसायातील 'मोठ्या माशां'वर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.