आखाडा बाळापूर : हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तोंडापूर येथील रेशन दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष थोरात (वय ४९) असे अपघातातील मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (दि.३) वारंगा-दांडेगाव रस्त्यावर वारंगा फाटा शिवारात घडली.
तोंडापूर येथील रेशन दुकानदार संतोष थोरात हे दुचाकी क्र. (एम.एच २६ ए.क्यू ०१७८) या दुचाकीवरून वारंगा फाट्यावरून आपल्या गावी जात होते. यादरम्यान वारंगा फाट्याकडे येणाऱ्या हायवा ट्रक क्र. (एम एच २६ एच ७९४२) या ट्रकची वारंगा-दांडेगाव रस्त्यावर वारंगा फाटा शिवारात दुचाकीला धडक बसली. या अपघातात संतोष थोरात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हायवा ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालक फरार आहे.