औंढा नागनाथ : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या दुकानांना आग लागून सहा दुकाने जळून खाक झाली आहेत. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. औंढा नागनाथ व हिंगोलीच्या अग्निशमन दलाने दोन तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीमध्ये हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शहरातील जुन्या बसस्थानकाच्या परिसरात मोबाईल विक्री व दुरुस्ती, बॅटरी दुरुस्ती, इलेक्ट्रीकल्स साहित्य विक्री व दुरुस्तीची दुकाने आहेत. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून अचानक धूर निघू लागला होता. या परिसरात असलेल्या हॉटेलचालकांनी दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मदतीसाठी आरडा ओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.
पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आयुब शेख, उपनिरीक्षक शेख खुडूस, जमादार ज्ञानेश्वर सावळे, अमोल चव्हाण, अनिल नागुलवार, दिनकरपोले, वसंत चव्हाण, रवीकांत हरकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या मार्गावरील वाहतुक काही काळ थांबवून तातडीने हिंगोली व औंढा नागनाथ येथील अनीशमन दलास पाचारण केले. दरम्यान, दोन तासानंतर म्हणजेच सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंतसहा दुकाने जळून खाक झाली होती.
या आगीमध्ये सरफराज पठाण, अखिल पठाण, नामदेव कोकाटे, सतीष बेद्रे, अब्दुल कदिर, रामभाऊ साळुंके यांच्या दुकानांचे नुकसान झाले असून हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस व नागरीकांनी तातडीने मदतीसाठी धावाधाव केल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आमदार संतोष बांगर आले धावून
औंढा नागनाथ येथे आग लागून सहा दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त व्यावसायिकांना तत्काळ प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जागेवरच दिली. एकूण ६ व्यावसायिकांना थेट मदत देऊन आमदार बांगर यांनी दिलासा दिला.