हिंगोली : विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिलच्या वतीने मंगळवारी (दि.19) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालक व मुख्याध्यापकांशी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांनी केलेल्या कथित घोटाळ्यावर प्रकाश टाकण्यात आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
मागील अनेक वर्षांपासून तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षणाधिकाऱ्याने अनेक अनियमित कामे करून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप केला. यामध्ये प्रामुख्याने सध्या कार्यरत असलेले शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांच्यावर रामतीर्थ पोलिस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच कुटूंर पोलिस ठाण्यात देखील गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ट असताना डिग्रसकर यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
डिग्रसकर यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथकामध्ये विविध कामे करण्यासाठी, नियमात न बसणारे विविध आदेश काढणे, जुनी, थकीत काही कारणास्तव थांबविण्यात आलेली देयके, पदमान्यता, सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदणी इत्यादीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूणच विराट राष्ट्रीय लोकमंच कॉन्सिलच्या वतीने शिक्षण विभागातील घोटाळ्यांबाबत ऊहापोह करण्यात आला आहे. शिक्षण विभागातील मागील दहा वर्षांच्या कार्यकाळातील संपूर्ण प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी अध्यक्ष शेख नईम शेख लाल, शेख नौमान नवेद, शेख बासीत, रवी जैस्वाल, शेख आवेज यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांना विचारले असता माझ्यापर्यंत शेख नईम शेख लाल यांचे निवेदन अद्याप आ-लेले नाही. निवेदन माझ्याकडे आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईल असे स्पष्ट केले.
शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालक व मुख्याध्यापकांशी संगनमत करून सन २०२४-२५ या एका आर्थिक वर्षात थकीत, फरकाची रक्कम व वैद्यकीय प्रतिपूर्ती १ कोटी १२ लाख २६ हजार २५७ रुपये अदा केले. शाळा मान्यता रद्द बाबतचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असलेल्या डॉ. एकबाल उर्दू स्कूल हिंगोली या शाळेतील एका कर्मचाऱ्याचे ४० टक्के वेतन फरकाची थकीत रक्कम ४० लाख ८६ हजार ८५३ रुपये नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आल्याचे माहितीच्या आधारे उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच २०२४-२५ या एका आर्थिक वर्षात वैद्यकीय प्रतिपूर्ती, थकीत देयके व फरकाची रक्कम असे एकूण ४ कोटी ८६ लाख ७ हजार ६०४ रुपये अदा केले आहेत.