वसमत पालिकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व  
हिंगोली

Hingoli News | वसमत पालिकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

नगराध्यक्षपदी सुनिता बाहेती विजयी, काँग्रेसच्या सिमा अब्दुल हाफीज पराभूत महाविकास आघाडीचा धुव्वा : तुतारीचा सुपडासाफ

पुढारी वृत्तसेवा

वसमत ः येथील नगर पालिकेची निवडणुक महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. परंतू, वसमत नगर पालिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय संपादन करीत महाविकास आघाडीचा खात्मा केला. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिता मनमोहन बाहेती यांनी काँग्रेसच्या सिमा अब्दुल हाफीज यांचा तब्बल 3 हजार 354 मतांनी पराभव केला. तर भाजपच्या उमेदवार सुषमा बोड्डेवार तिसऱ्या स्थानावर राहिल्या. आमदार राजू पाटील नवघरे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर जनतेने विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले.

शनिवारी येथील पालिकेच्या 30 नगरसेवक व नगराध्यक्षांच्या निवडणुकीसाठी मतदारप्रक्रिया पार पडली. रविवारी सकाळी 10 च्या सुमारास मतमोजणीस सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता बाहेती आघाडीवर होत्या. प्रत्येक फेरीनिहाय बाहेती यांची आघाडी कायम राहीली. सुनिता मनमोहन बाहेती यांना 20 हजार 165, काँग्रेसच्या सिमा अब्दुल हाफीज यांना 16 हजार 714 तर भाजपच्या सुषमा बोड्डेवार यांना 5 हजार 403 मते मिळाली. सुनिता बाहेती या 3451 मतांनी विजयी झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 16, शिवसेना शिंदे गटाचे 2, शिवसेना ठाकरे गटाचे 2, भाजपचे 4 व काँग्रेसचे 4 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागा जिंकून पालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आमदार राजू नवघरे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून केवळ विकासाच्या नावावर मते मागत विजय साकारला. विजयाचे संपूर्ण श्रेय आमदार नवघरे यांच्या नियोजनाला दिले जात आहे.

तुतारीचा सुपडा साफ

माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या रूपाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम नेतृत्व मिळाले. परंतू, पालिकेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. पालिकेच्या निवडणुकीतून तुतारी गायब झाली. त्यामुळे दांडेगावकर यांना पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागला. विशेष म्हणजे दांडेगावकरांचे राजकीय शिष्य असलेले आमदार राजू नवघरे यांनी पुन्हा एकदा आपल्या राजकीय गुरूला आस्मान दाखविले आहे.

हा विजय वसमतकरांना समर्पित

वसमतकरांनी आमच्या उमेदवारांना भरभरून साथ दिली. हा विजय मेहनत घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांना व वसमतकरांना अर्पित करतो. आता वसमतचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. वसमतच्या जनतेने माझ्या विकास कामाला कौल दिला आहे. आगामी काळात वसमतकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार राजू पाटील नवघरे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT