हिंगोली : नांदेड विभागाच्या विज कंपनीच्या थकीत देयकाच्या वसुलीसह इतर सूचनांसाठी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित एका बैठकीत हिंगोलीच्या सहाय्यक अभियंत्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
वीज कंपनीच्या नांदेड येथील मुख्य अभियंता कार्यालयाकडून व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आवश्यक त्या सूचना नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील वीज कंपनीच्या अभियंत्यांना दिल्या जातात. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता व्हीसी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वीजबिल थकबाकी वसुली व इतर माहिती दिली जात असताना सहाय्यक अभियंता सचिन दत्तात्रय कोळपे (३५) हे खुर्चीवरून खाली पडले. सोबतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार असून ते मुळचे नांदेड येथील रहिवासी असल्याचे विज कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.