हिंगोली : शहरातील कयाधू नदीच्या पुरामध्ये महादेववाडी भागातील एक तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) घडली. घटनास्थळी पोलिस, महसूल प्रशासन व पालिकेचे पथक दाखल झाले असून तरुणाचा शोध सुरु झाला आहे.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील दोन दिवसांपासून हलका ते दमदार पाऊस सुरु आहे. या मागील चोविस तासात हिेंगोली जिल्हयात २० मिलीमिटर पावसाची नोंद झाली असून आखाडा बाळापूर, वारंगाफाटा, डोंगरकडा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. इसापूर धरणाचे ११ दरवाजे ५० सेंटीमिटरने उघडून १८२८८ क्युसेक पाण्याचा पैनगंगानदीमध्ये विसर्ग केला जात आहे.
येलदरी धरणाचे दोन दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडून ६९२० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सिध्देश्वर धरणातून ११५१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दरम्यान, धरणातून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदी, नाल्यांना पुर आले आहेत. या शिवाय हिंगोली जिल्हयातील पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आहे. हिंगोली ते समगा मार्गावरील लहान पुलावरून कयाधूचे पाणी वाहात असल्यामुळे हिंगोली ते समगा, दुर्गधामणी, कंजारा, पुर यासह इतर गावांचा संपर्क तुटला आहे. समगा येथील गावकऱ्यांना रेल्वेच्या पुलावरून वाहतूक करावी लागत आहे.
दरम्यान, हिंगोली शहरातील महादेववाडी भागातील शेख अरबाज शेख फेरोज (१८) हा तरुण कयाधू नदीवर गेला होता. यावेळी त्याचा पाय घसरुन तो नदीत पडल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल घुगे, जमादार प्यारेवाले यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सय्यद अय्युब, तलाठी वाबळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिस व नागरीकांच्या मदतीने अरबाज याचा शोध सुरु आहे.