हिंगोली

Hingoli News | हट्टा ग्रामपंचायतीचा 'रामभरोसे' कारभार: ग्रामसेवक १० दिवसांपासून बेपत्ता, नागरी सुविधांचा बोजवारा

प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे

पुढारी वृत्तसेवा

हट्टा: हट्टा ग्रामपंचायतीचा कारभार सध्या पूर्णपणे रुळावरून घसरला असून, प्रभारी राज आणि प्रशासकीय अनास्थेमुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून ग्रामसेवक कर्तव्यावर अनुपस्थित असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले असून, गावातील मूलभूत सुविधांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.

स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; नाल्या तुडुंब, कचऱ्याचे ढीग

गावातील कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. घंटागाडी नियमित येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरली आहे. त्यातच नाल्यांची साफसफाई अनेक दिवसांपासून रखडल्याने त्या तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच भाग्यनगर येथील सोलर प्लांट गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. परिणामी, पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

प्रशासकीय कामे रखडली; नागरिक त्रस्त

ग्रामसेवक नसल्याने केवळ साफसफाईच नाही, तर महत्त्वाची कागदोपत्री कामेही थांबली आहेत. प्रामुख्याने नमुना क्रमांक ८ चे फेरफार आणि इतर दाखल्यांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. 'आज या, उद्या या' अशा उत्तरांमुळे सामान्य जनता वैतागली आहे. "ग्रामपंचायतीचा हा विस्कळीत कारभार त्वरित सुधारण्यात यावा. वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करावी आणि प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT