हिंगोली : सेनगाव तालुक्यातील अधिकृत रेती घाटावरून लिलावधारकांनी शिल्लक पावत्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रेतींचा बेसुमार साठा जमा केला होता. तो जिल्हा प्रशासन व महसूल प्रशासनाने जप्त करून त्या रेती साठ्यातून तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेचे (घरकुल) लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी पाच ब्रास मोफत रेती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, जिल्हा खनिकर्माधिकारी अश्विनकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव तालुका तहसील प्रशासनाकडून देण्यात येणार आहे. त्याकरता घरकुल लाभार्थ्यांनी आपली संपूर्ण संबंधित विभागातून माहिती प्राप्त करून मोफत पाच ब्रास रेतीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी केले आहे.
सेनगाव तालुक्यातील अनेक रेती घाटावरून लिलावधारकांनी शिल्लक पावत्याच्या नावाखाली हजारो ब्रास रेती अवैध साठा करण्यात आला होता. त्यामध्ये लिंबाळा हुंडी 1458 ब्रास रेती, चिखलागर 1313 ब्रास, ब्रह्मवाडी 6055 ब्रास, बन 890 ब्रास, वझर खुर्द 1394 ब्रास, व पिपरी बरडा 887 अशी एकूण 11,997 ब्रास रेती साठा करण्यात आला होता याची प्रती ब्रास 5000 रुपये धरल्यास ती संपूर्ण रेती साठा अंदाजे 6 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा व्यक्त करण्यात येत आहे.
हा अवैध रेती साठा तालुका महसूल प्रशासनाने ताब्यात घेऊन संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे या रेती साठ्यातून तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनेक घरकुल लाभार्थ्यांचे रेती अभावी घराचे बांधकाम रखडले असून अनेकांना रेती माफिया कडून रेती विकत घेणे परवडत नसल्याने अनेकांनी स्वतःचे घर बांधकाम बंद केले असल्याचे धक्कादायक प्रकार सेनगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे.
आता तालुका तहसील प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून येणाऱ्या काळात त्या जप्त केलेल्या रेती साठ्या मधून प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला प्रती लाभार्थी पाच ब्रास मोफत रेती दिल्या जाणार असल्याने तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी आपली मोफत रेती प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने संबंधित बांधकाम विभाग व शहरी भागातील लाभार्थ्यांनी नगरपंचायत बांधकाम विभागाशी संपर्क साधावा व त्यानंतर संबंधित कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात येऊन नियुक्त अधिकाऱ्याची संपर्क साधून आपली घरकुल लाभार्थी म्हणून मोफत प्रति लाभार्थी पाच ब्रास रेती उचल करावी असे आव्हान तालुका तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी केले आहे.
घरकुल लाभार्थ्यांनी मोफत रेतीचा लाभ घ्यावा:- मांडवगडे
सेनगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी आवास निर्माण योजना (घरकुल) लाभार्थ्यांनी राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार घरकुल प्रती लाभार्थी पाच ब्रास मोफत रेती याप्रमाणे दिल्या जाणार आहे या मोफत रेतीचा सर्व घरकुल लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी केले आहे.