वसमत: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत कारंजा चौक ते महावीर चौक या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच दुकानांसमोरील अनधिकृत बांधकामे हटविल्याने हा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून टप्प्याटप्प्याने सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. नियमबाह्य अतिक्रमणांवर कुठलाही भेदभाव न करता कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी रफिक कंकर यांनी सांगितले. या कारवाई वेळी मुख्याधिकारी रफिक कंकर, धोंडिबा दळवी, शिकारी, सोनवणे, बिराजदार, सुकते, मुजावर, देशमुख, चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडक पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली असून पोलिस निरीक्षक सुधीर वाघ हे आपल्या पथकासह घटनास्थळी तैनात होते. एकीकडे रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असताना, दुसरीकडे विक्रेत्यांचा संताप आणि निवडक कारवाईचे आरोप यामुळे ही मोहीम पुढे कशी राबवली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"आम्ही सकाळी व्यवसायासाठी बसतो आणि संध्याकाळी घरी जातो, पण शहरातील काही ठिकाणी लोकांनी कायमस्वरूपी पक्के बांधकाम करून दुकाने थाटली आहेत. त्या अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही? असा सवाल फुटकळ विक्रेत्यांनी उपस्थित केला."