SC Sub Categorization
सेनगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी (दि. १३) सेनगाव येथे मातंग समाजाच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. सकल मातंग समाज सेनगाव शहर व तालुक्याच्या वतीने आयोजित हा मोर्चा नियोजित अण्णाभाऊ साठे सभागृहातून सुरू होऊन अप्पास्वामी प्रवेशद्वार, बसस्थानक परिसर, शिवाजी चौक व जिजामाता चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला.
अनुसूचित जातींमधील अतिमागास घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं', 'आरक्षणाचे झाले काय, आमच्यापर्यंत आलेच नाही', 'उपवर्गीकरण तात्काळ लागू करा' अशा घोषणांनी सेनगाव शहर दणाणून गेले. मोर्चात महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी विविध मान्यवरांनी उपवर्गीकरणाची आवश्यकता स्पष्ट केली. मातंग समाजाचे नेते तथा लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राधाजी शेळके यांनी राज्य सरकारला हिवाळी अधिवेशनात उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी केली. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मोर्चाला विविध सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
उपवर्गीकरण लागू करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा!
राज्यात उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आणि विरोधातही मोर्चे निघत असल्याने दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन हिवाळी अधिवेशनात अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी राधाजी शेळके यांनी केली.