हिंगोली : गजानन लोंढे
हिंगोलीकरांच्या हक्काचे पाणी नांदेडकडे वळविण्याचा घाट सरकारने घातला आहे. खरबी येथे बंधारा करून भूमिगत बोगद्याने कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवून ते पुढे नांदेडकडे नेले जाणार आहे. बोगद्याचे काम सुरू झाले आहे. या कामाला सत्ताधारी आमदारांनी कोणताही विरोध दर्शविला नाही. परंतू, शेतकरी व विरोधकांनी मात्र या प्रकल्पाला जोरदार विरोध सुरू केला आहे.
कयाधू नदीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जात असल्याने हिंगोली व कळमनुरीच्या सत्ताधारी आमदारांना मात्र याचा फटका बसण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. भूमिगत बोगद्याने सत्ताधारी आमदारांच्या तोंडचे पाणी पळविले असून सध्या कयाधू नदीचे पाणी ऐन उन्हाळ्यात पेटल्याचे चित्र आहे. या प्रकल्पावरून भविष्यात विद्यमान आमदारांना राजकीय किंमत मोजावी लागेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जिल्ह्याची जीवनदायीनी म्हणून ओळख असलेल्या कयाधू नदीवर उच्च पातळीचे बंधारे बांधून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवावे यासाठी जिल्हा संघर्ष समितीचे माजी खासदार शिवाजी माने, दत्तराव अडकिणे यांच्यासह इतरांनी मागील अनेक वर्षापासून राज्य शासनाशी संघर्ष सुरू ठेवला आहे. 10 वर्षापुर्वी राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्याचा तब्बल 15 हजार हेक्टर क्षेत्राचा स्वतंत्र सिंचन अनुशेष जाहीर केला. परंतू, सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला मंजूरी दिली नाही.
काही बंधारे व साठवण तलाव यांचा अपवाद वगळता पावसाळ्यात कयाधू नदीचे पाणी वाहून जात आहे. कयाधू नदीवर बंधारे बांधून त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करणे गरजेचे असताना राज्य सरकारने मात्र हिंगोलीकरांच्या हक्काचे पाणी थेट नांदेडला पळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शेकडो कोटी रूपयांच्या निधीतून हिंगोली जवळील खरबी येथे बंधारा बांधून तेथून भुमिगत बोगद्याच्या माध्यमातून नदीचे पाणी थेट इसापूर धरणात वळविले जात आहे. या बोगद्याच्या कामासाठी मोठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
जमिनीखाली 80 ते 100 फुट खोल खोदकाम केले जात आहे. ज्या भागातून हा बोगदा जात आहे त्या भागातील विहीर व बोअरचे पाणी आटण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. एकीकडे पाणी इतर जिल्ह्याला नेले जात आहे तर दुसरीकडे भुमिगत बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणी देखील उपसल्या जाणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. हिंगोलीच्या आमदारांनी या बंधाऱ्याला सभागृहात विरोध करणे गरजेचे होते. परंतू, त्यांनी तशी तत्परता दाखविली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांसह विरोधक करीत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणी पाण्यासाठी आपली राजकीय कारकिर्द धोक्यात घालून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतात. परंतू, हिंगोलीतील लोकप्रतिनिधी मात्र दिर्घकालीन सार्वजनिक फायद्याच्या मुद्यांवर सभागृहात मौन पाळतात. फक्त वैयक्तिक स्वार्थाच्या योजनांवरच येथील लोकप्रतिनिधींचे विशेष लक्ष असल्याचा अनुभव अनेकदा येथील जनतेला आला आहे. येत्या पाच वर्षात या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर खरबीच्या खालील भागाचे वाळवंट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. परंतू, लोकप्रतिनिधी मात्र आपल्याच तोऱ्यात मग्न आहेत. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत हिंगोलीकरांच्या हक्काचे पाणी पळविण्यास विरोध न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सेनगाव तालुक्यातून वाहत आलेली कयाधू नदी कळमनुरी तालुक्यातून पुढे नांदेडकडे वाहत जाते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पूर येऊन ते पाणी समोर जाते. कयाधू नदीवर उच्च पातळीचे बंधारे उभारल्यास हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मोठी मदत होणार होती. परंतू, येथील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेमुळे कयाधू नदीचे पाणी नांदेडकडे वळविले जात आहे. परिणामी, पुढील चार ते पाच वर्षात कळमनुरी तालुक्यातील शेकडो गावांना या भुमिगत बोगद्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. हा प्रश्न अत्यंत गंभीर असताना देखील सत्ताधारी लोकप्रतिनिधी मुग गिळून गप्प बसले आहेत. विरोधकही नावापुरतेच आंदोलन करीत आहेत.