Irrigation Department Land Encroachment
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाच्या शासकीय जागेवरील संरक्षण भिंत पाडून अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत सुमारे १३० मीटर लांबीची विटा व सिमेंटची भिंत जमीनदोस्त करण्यात आली असून, शासनाचे अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पैनगंगा प्रकल्प विभागाच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागीय पथक क्रमांक ४, आखाडा बाळापूर येथे कार्यरत सहाय्यक अभियंता पंकज आत्माराम गंगाडे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. वारंगा फाटा येथील गट क्रमांक ४७५ मधील सर्व्हे क्रमांक १०५/२ या शासकीय जमिनीवर प्रकल्प विभागाची संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ही भिंत पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संबंधित ठिकाणी सुमारे ४.५७ हेक्टर क्षेत्रफळाची शासकीय जमीन आहे. या जमिनीवरील संरक्षण भिंत पाडून जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप आहे. या कृत्यामुळे शासनाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा अंदाज १५ ते २० लाख रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार बालाजी जोगदंड पुढील तपास करीत आहेत. शासकीय मालमत्तेचे नुकसान करून अतिक्रमण करण्याच्या या प्रकारातील संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.