Kalamnuri Two Killed In Bike Collision
कळमनुरी : उमराफाटा ते बोल्डा फाटा मार्गावरील जांभरून शिवारात दोन दुचाकींची भीषण धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात हिंगोली येथील अब्दुल मजीद बागवान (६५) आणि राजेश साखरे (३८, रा. वाकोडी, ता. कळमनुरी) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्यांना मृत घोषित करण्यात आले.
हिंगोली शहरातील तलाबकट्टा परिसरातील रहिवासी अब्दुल मजीद बागवान यांची जांभरून शिवारात शेती आहे. शुक्रवारी दुपारी ते दुचाकीवरून आपल्या शेताकडे जात होते. याचवेळी उमराफाटा ते बोल्डा फाटा मार्गावर बोल्डा फाट्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघाताचा मोठा आवाज ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कळमनुरी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर रसाळ, पोलीस उपनिरीक्षक तुरनर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. पी. सांगळे, जमादार शेख रहीम, दिलीप पोले, गजानन होळकर आणि लक्ष्मीकांत माखने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेतून कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.
दरम्यान, राजेश साखरे हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होते. शुक्रवारी बोल्डा येथे आठवडी बाजार असल्याने ते भाजीपाला विक्रीसाठी गेले होते. बाजार आटोपून कळमनुरीकडे परतत असताना जांभरून शिवारात त्यांच्यावर काळाने घाला घातला.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
तर अब्दुल मजीद बागवान यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा परिवार आहे. एकाच अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सायंकाळी उशिरा दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.