Moneylending Raid Pudhari
हिंगोली

Hingoli Crime : हिंगोलीत अवैध सावकारीचा संशय; भाजीमंडईतील कार्यालयावर छापा!

पाच रजिस्टर, २३ डायऱ्या, सात कोरे धनादेशांसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : शहरात अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून जिल्हा उपनिबंधकांच्या पथकाने शुक्रवारी (ता. २७) भाजीमंडई परिसरातील एका कार्यालयावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईत सावकारी व्यवहारांच्या नोंदी असलेली पाच रजिस्टर, २३ लहान-मोठ्या डायऱ्या आणि खातेदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले सात कोरे धनादेश आढळून आले. याशिवाय विविध व्यक्तींच्या नावावरील १३ मुद्रांक, १६ ओळखपत्रे आणि २६ चिठ्ठ्याही पथकाने जप्त केल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे संबंधित कार्यालयातील आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली जात आहे.

हिंगोली शहरात परवानगीशिवाय सावकारी व्यवसाय केला जात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भाजीमंडई परिसरातील निवास बाबूराव साबळे यांच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. पथकप्रमुख ए. डी. गुठ्ठे यांच्यासह शिवशंकर आंधळे, अनोज वानखेडे आणि के. जी. धालेवाड या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

कागदपत्रांची पडताळणी सुरू

झडतीदरम्यान पथकाला सावकारी व्यवहारांशी संबंधित असल्याचा संशय असलेली विविध कागदपत्रे आढळून आली. यामध्ये पाच रजिस्टर, २३ लहान-मोठ्या डायऱ्या, स्वाक्षरी केलेले सात कोरे धनादेश, १३ मुद्रांक, १६ ओळखपत्रे आणि २६ चिठ्ठ्यांचा समावेश आहे. हे सर्व दस्तावेज पथकाने जप्त केले आहेत. संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करून त्यातील नोंदी आणि व्यवहारांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिली. या पडताळणीतून अवैध सावकारीच्या व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT