वसमत (परभणी / हिंगोली) : मागील पंधरवाड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे होते नव्हते ते ही मातीत मिसळल्याने शेतकऱ्यांना आधाराची गरज निर्माण झाल्याची बाब लक्षात घेऊन मंगळवारी (दि.16) आमदार राजू नवघरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन शेतकऱ्यांना सरसगट तातडीने मदत देण्यासह कर्जमाफीची मागणी केली.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अडीच महिन्याच्या काळात तीन ते चार वेळेत अतिवृष्टी झाली. त्यामुळे वसमत विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यातील हळद, कापूस, सोयाबीन, केळी, पपई यासह इतर सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी संकटात सापडला. प्रशासनाकडून पंचनाम्याची कारवाई सुरू असताना पुन्हा दोन दिवसांपूर्वी वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामध्ये गुंडा येथील दोन महिला वाहून जाऊन मृत्युमुखी पडल्या तर अनेक शेतकऱ्यांच्या गायी, मेंढ्यांची जीवितहानी झाली. आमदार नवघरे यांनी मतदार संघातील जवळपास ६० ते ७० गावांना भेटी देत नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला. मंगळवारी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट कोणतीही अट न घालता मदत देण्याची मागणी केली तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी यासाठी देखील निवेदन दिले. उपमुख्यमंत्री पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही लवकरच मदत दिली जाईल असा शब्द आमदार नवघरे यांना दिला.
मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आपण मदतीसाठी सकारात्मक असल्याचे सांगितले आहे, असे आमदार राजू नवघरे यांनी स्पष्ट केले.