Sengaon Firecracker Shop Inspection  Pudhari
हिंगोली

Hingoli Firecracker Accident | हिंगोलीतील फटाका दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क; सेनगाव बाजारपेठेत फटाका दुकानांची तपासणी

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Sengaon Firecracker Shop Inspection

सेनगाव : हिंगोली येथे नुकत्याच घडलेल्या फटाका दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सेनगाव प्रशासन सतर्क झाले असून, फटाका विक्री आणि साठवणुकीच्या ठिकाणी सुरक्षा नियमांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. बुधवार (दि. ७) आठवडी बाजाराच्या दिवशी सेनगाव पोलीस ठाणे आणि नगरपंचायत प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शहरातील फटाका दुकानांची अचानक तपासणी केली. दुपारी एकच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे फटाका विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली.

आठवडी बाजारामुळे शहरातील प्रमुख भागांत नागरिकांची मोठी गर्दी होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आप्पास्वामी प्रवेशद्वाराजवळील एका मोठ्या फटाका दुकानासह बसस्थानक परिसरातील तीन दुकानांची तपासणी केली. या वेळी फटाक्यांचा साठा, विक्रीचा परवाना, परवान्याची वैधता तसेच आग प्रतिबंधक सुरक्षा साधनांची उपलब्धता याची पाहणी करण्यात आली.

रहिवासी भागात फटाका साठवणुकीस मनाई

मुख्य बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे आणि दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात फटाक्यांची साठवणूक करू नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने विक्रेत्यांना दिल्या. फटाक्यांचा साठा शहराबाहेर, मानवी वस्तीपासून सुरक्षित अंतरावर आणि अधिकृत परवानाधारक ठिकाणीच ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.

फटाका विक्री व साठवणुकीच्या ठिकाणी आग लागल्यास तातडीने उपाययोजना करता यावी, यासाठी अग्निशामक नळकांडी उपलब्ध ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकान सील करणे, परवाना रद्द करणे तसेच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश लोंढे, बीट अमलदार सुभाष चव्हाण, रवि सुरदुसे, गुलाब पवार तसेच नगरपंचायत कर्मचारी बबन दिनकर आणि विनायक पडोळे सहभागी झाले होते. आगामी काळातही फटाका विक्री केंद्रांवर प्रशासनाची नियमित नजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT