हिंगोली: नात्यातील मुलासोबत लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका पित्याने आपल्या १७ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करून नंतर स्वतःही जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना हिंगोली शहरातील मस्तानशहानगर भागात उघडकीस आली आहे.
या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या शोकांतिकेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी मयत पित्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील मस्तानशहा नगर येथे राहणारे सय्यद साकेर आणि त्यांची मुलगी मन्तशानाज (वय १७) यांचे मृतदेह बुधवारी (दि.२०) पहाटे त्यांच्या घरात आढळून आले. सय्यद साकेर यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर मुलगी मन्तशानाज मृतावस्थेत त्यांच्या शेजारीच पडलेली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक आंबादास भुसारे, शहर पोलीस निरीक्षक संदीप मोदे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला या दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नव्हते, ज्यामुळे परिसरात अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आणि तपास सुरू केला.
दिवसभर चाललेल्या तपासानंतर, बुधवारी रात्री उशिरा सय्यद जाकीर यांनी दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणावरील पडदा दूर झाला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद साकेर हे त्यांची मुलगी मन्तशानाज हिच्यावर तिच्या मावशीच्या मुलाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. मात्र, मन्तशानाजने या लग्नास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणावरून बाप-लेकीमध्ये तीव्र वाद झाला. मन्तशानाजने लग्नास नकार दिल्याने सय्यद साकेर प्रचंड संतापले. रागाच्या भरात त्यांनी उशीने तोंड दाबून मन्तशानाजचा श्वास कोंडला आणि तिची हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर त्यांना केलेल्या कृत्याचा तीव्र पश्चात्ताप झाला. या मनस्तापातून त्यांनी आधी स्वतःच्या छातीवर आणि हाताच्या मनगटावर चाकूने वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही जीव जात नसल्याने अखेर त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले.
या धक्कादायक माहितीनंतर हिंगोली शहर पोलिसांनी सय्यद जाकीर यांच्या तक्रारीवरून मयत पिता सय्यद साकेर यांच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एका पित्यानेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याच्या या वृत्ताने समाजमन सुन्न झाले आहे. कौटुंबिक सन्मान आणि हट्टापायी एका कोवळ्या जिवाचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.