औंढा नागनाथ: सततची नापिकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर कसा उतरवायचा, या विवंचनेतून औंढा नागनाथ तालुक्यातील साळणा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनकर कुटे (वय ४८ वर्ष) असे या शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनकर कुटे यांच्याकडे साळणा शिवारात केवळ १ एकर ३१ आर शेती आहे. अल्प जमीन असल्याने ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका त्यांना बसला. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोडाशी आलेले पीक गेलेच, शिवाय लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. खरीपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघेल, अशी त्यांना आशा होती. मात्र, रब्बीनेही साथ दिली नाही.
बँकेचे कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढायचा, या काळजीत दिनकर कुटे वावरत होते. कुटुंबाने त्यांना वारंवार धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी 'शेतात जातो' असे सांगून गेलेले दिनकर रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत. शोधाशोध केली असता, त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला.
या प्रकरणी ज्योती कुटे यांनी दिलेल्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात १२ मार्च २०२६ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत दिनकर कुटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार जी. बी. गिरी आणि शंकर भिसे करत आहेत.