हिंगोली : सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथे शेतात हरभरा गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकरी व त्यांच्या दोन मुलांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर मुले गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथील शेतकरी भास्कर नाथराव खिल्लारे (४३) ही त्यांची मुले धनंजय खिल्लारे व धम्मदीप खिल्लारे यांच्या सोबत बुधवारी सकाळीच शेतात हरभरा काढणीच्या कामासाठी गेले होते. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिघेही हरभरा काढण्यात व्यस्त असताना अचानक आग्या महोळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तिघेही घाबरून गेले. त्यांनी मधमाश्या हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्बल १० ते १२ हजार मधमाश्यांपुढे त्यांना बचावाची संधीही मिळाली नाही.
यामध्ये भास्कर हे गंभीर जखमी होऊ खाली कोसळले तर धनंजय व धम्मदीप गंभीर जखमी झाले. या परिस्थितीतही धनंजय यांनी तातडीने गावात येऊन माहिती दिल्यानंतर सुनील खिल्लारे व नागोराव शिंदे यांनी शेतात जाऊन आग पेटवली. त्यानंतर मधमाशा भास्कर यांच्यापासून दूर झाल्या.
त्यानंतर शेतकरी भास्कर यांना तातडीने उपचारासाठी हिंगोली येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. तर धनंजय व धम्मदीप यांच्यावर उपचार करण्यात आले असून धनंजय यांची प्रकृती गंभीर आहे. मयत भास्कर यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.