हिंगोली ः येथील जिजामाता नगर परिसरातील सार्वजनिक नळावर पाण्यासाठी रांगा लागत असल्याचे दिसत आहे. pudhari photo
हिंगोली

Hingoli News : पंप डिझेल अभावी, तर नळ पाण्याअभावी कोरडेठाक

पंपांवर वाहनांच्या रांगा, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली ः मागील आठवडाभरापासून अभूतपूर्व डिझेल टंचाई झाल्याने सर्वच पंपांवर वाहनांच्या रात्रंदिवस रांगा लागत आहेत. डिझेल टंचाईने वाहतुकीसह शेतीकामांवर मोठा परिणाम झाला असताना दुसरीकडे हिंगोली शहरात आठ ते दहा दिवस पालिकेच्या नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी बहुतांश वार्डातील नागरीकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. हिंगोलीतील नागरीकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

मागील आठवड्यापासून अचानक डिझेलची मागणी वाढल्याने दुपारनंतर सर्वच पंपांवर नो स्टॉकचा फलक लावल्या जात आहे. डिझेलसाठी ट्रॅक्टरसह इतर वाहने रांगेत उभे राहत आहेत. दिवसभर उन्हात उभे राहून डिझेल मिळेल किंवा नाही याची शाश्वती नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पेरणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

डिझेल टंचाईची झळ येथील हळद बाजारास देखील बसली असून बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक होत असतानाच डिझेल अभावी वाहतुक व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे. परिणामी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हजारो टन हळद मार्केट यार्डातच पडून आहे. येथील खाजगी ट्रॅव्हल्सला देखील डिझेल टंचाईचा फटका बसला असून अनेक ट्रॅव्हल्स मागील चार दिवसांपासून जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

एकुणच डिझेल अभावी जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शासनाकडून डिझेलचा पुरवठा बऱ्यापैकी सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतू, पंपांवर शेतकऱ्यांना रांगा का लावाव्या लागत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. जर डिझेलचा साठा आहे तर तो नेमका जातोय कुठे याचा शोध यंत्रणेने घेणे गरजेचे बनले आहे.

हिंगोलीत पाणीबाणी

भर उन्हाळ्यात हिंगोली शहरातील नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने गेल्या आठवडाभरापासून नळ कोरडे पडले आहेत. घरगुती वापराच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी प्रभाग क्र 1 मधील नागरीकांनी थेट पालिका प्रशासनास निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. एकुणच पंपावर डिझेलसाठी तर नळावर पाण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT