हिंगोली : शहरात जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानच्या अंगणातील चंदनाचे झाड चोरट्यांनी पळविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.११) अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही येथील एक चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
शहरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला असून दर आठ तासांना दोन कर्मचारी कर्तव्यावर येतात. याशिवाय अंगणातील झाडांची देखभाल करण्यासाठी एक माळीकाम करणार्या कर्मचार्याचीही नियुक्ती आहे. दरम्यान, रविवारी रात्री नेहमीप्रमाणे पोलिस कर्मचारी कर्तव्यावर होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश करून त्या ठिकाणी असलेले चंदनाचे झाड तोडून नेले. मात्र, या घटनेची कानोकान खबरही त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या कर्मचार्याला लागली नाही. दरम्यान, सोमवारी सकाळी त्या ठिकाणी माळीकाम करणारे शिवप्रसाद शिंदे हे आल्यानंतर त्यांना चंदनाचे झाड दिसले नाही. त्यांनी हा प्रकार जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या कानावर टाकला. तसेच शहर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांनी जमादार पोटे, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शेख मुजीब यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन ते तीनजण झाडाच्या जवळ असल्याचे दिसून आले. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहे. या घटनेमुळे पोलिस दलासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून यापूर्वीही एक चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्या चोरीचा अद्यापही तपास लागला नाही. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.