Hingoli Ravan Dahan
हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात गुरुवारी रात्री रामलीला नाटिकेत राम-रावण युद्धानंतर रावण दहनाचा सोहळा पार पडला. ५१ फुटी रावण दहनाचा कार्यक्रम डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी लाखो नागरिक रामलीला मैदानावर उपस्थित होते.
हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवात कृषी व औद्योगिक प्रदर्शनीसोबतच रावण दहनाचा कार्यक्रम मुख्य आकर्षण असतो. शहरातील रामलीला मैदानावर मध्य प्रदेशातील कलावंतांनी रामलीला नाटिका सादर केली. विजयादशमीला रावण दहनाचा कार्यक्रम होतो.
यावर्षी विजयादशमी निमित्त गुरुवारी सकाळपासूनच नागरिक रामलीला मैदानावर येऊ लागले होते. त्यामुळे कृषी व औद्योगिक प्रदर्शनी नागरिकांनी फुलून गेली होती. सुमारे १ लाखापेक्षा अधिक नागरिकांनी एकाच दिवसांत भेट दिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर रामलीला नाटिकेमध्ये रात्री प्रभू श्रीराम-रावण युद्धाचा प्रसंग सादर करण्यात आला. यामध्ये युद्धानंतर रावण मारला गेल्याचा प्रसंग सादर झाल्यानंतर रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी रावण दहन करण्यात आले. यावेळी लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, दसरा महोत्सव समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
रामलीला मैदानावर रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लाखो नागरिकांची गर्दी झाली होती. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील नागरिक खाजगी वाहनांद्वारे हिंगोलीत दाखल झाले होते. त्यामुळे नागरिकांच्या गर्दीने हिंगोली शहर देखील फुलून गेले होते. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.