Two die after being swept away in flood waters; Crop damage likely to increase
पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू; पीक नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे 245 गावांमधून 56 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून 34 जनावरे दगावली तर 36 घरांची अंशतः पडझड झाली आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी (दि.19) पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की, जिल्हयात जून महिन्यापासून ते आजपर्यंत 547 मिलीमिटर पाऊस अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात 642 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये 30 पैकी 24 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हयात घोडदरी येथील एका तरुण शेतकर्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला तर पारोळा येथील धबधब्यावर गोविंद लोेंढे (रा. मेथा) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या शिवाय 34 जनावरे पुरामुळे दगावली असून यामध्ये 22 दुधाळ जनावरे, 5 लहान जनावरे, सहा ओढकाम करणारी जनावरे तर एका लहान जनावराचा समावेश आहे. या शिवाय तीन गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हयातील 36 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयात पिक नुकसानी मध्ये प्राथमिक अंदाजानुसार 245 गावे बाधित झाली असून यामध्ये 58 हजार 817 शेतकर्यांचे 56 हजार 806 हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये सर्वात जास्त सेनगाव तालुक्यात 47839 हेक्टर, कळमनुरी 2725, हिंगोली 1625, वसमत 3500 तर औंढा तालुक्यातील 1116 हेक्टरचा समावेश आहे. सर्वेक्षणाचे काम सुरुच असून पिक नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.