औंढा नागनाथ : तालुक्यातील हिवरखेडा येथील रहिवासी आदेश उत्तमराव ठोके (वय : 25 वर्षे) हे येळी फाटा येथे पंक्चरचे दुकान चालवून आपली उपजीविका करीत होते. मात्र, त्यांना ‘इथे दुकान का लावतो?’ असे म्हणत काही जणांकडून नेहमी व सतत त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
रोडवर दुकान लावू न देण्यासाठी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने त्रासाला कंटाळून आदेश ठोके यांनी 24 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेच्या दरम्यान मौजे येळी फाटा येथील आंधळे कॉम्प्लेक्समध्ये जीवन संपवले.
या प्रकरणी सरपंच संतोष नागोराव मोरगे, उपसरपंच बाळासाहेब भानुदास सानप, भानुदास सानप, विठ्ठल नागोराव मोरगे, नागोराव नामदेव मोरगे (सर्व रा. हिवरखेडा) आणि नारायण बाबुराव आंधळे यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी देशमुख व पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन पाहणी केली.
फिर्यादी श्रीरंग फकीरा खिल्लारे (रा. हिवरखेडा) यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख करीत आहेत. याबाबत अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही.