हिंगोली : शहरातील एनटीसी भागात वीज पुरवठा खंडीत केल्यानंतरही खाजगी मोबाईल कंपनीच्या जनरेटरमधून वीज पुरवठा सुरु झाल्यामुळे विजेच्या खांबावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वीज कंपनीने चौकशी सुरु केली आहे.
शहरातील एनटीसी भागात आदिवासी विभागाच्या वतीने मुलींच्या वसतीगृहाचे काम केले जात आहे. या ठिकाणी वीज पुरवठ्यासाठी रोहित्र बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास त्या भागातील वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर कंत्राटी कामगार असलेले रितीक गोपाल टेकाम (२५, रा. महेंद्री, ता. वरुड, जि. वाशीम) हे काम करण्यासाठी खांबावर चढले होते. यावेळी अचानक विजेचा धक्का बसल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगमनाथ परगेवार, जमादार संजय मार्के, अमजद पठाण, अशोक धामणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच विज कंपनीचे अभियंता आर. बी. देशमुख यांच्यासह विज कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शहरातील तीनही उपकेंद्रावरून शहराचा विज पुरवठा खंडीत केल्यानंतरही खांबावर आगीच्या ठिगण्या दिसून येत होत्या. त्यानंतर वीज कंपनीचे अधिकारी व विद्यूुत निरीक्षकांनी पाहणी केली असता बाजूलाच असलेल्या एका खाजगी मोबाईल कंपनीचे जनरेटर सुरु झाल्यामुळे त्यातून विज पुरवठा येत असल्याचे दिसून आला. त्यानंतर जनरेटर बंद करून खांबावरील मृत रितीक टेकाम यांना पालिकेच्या अग्नीशमनदलाने त्यांना खाली उतरविले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.
या संदर्भात विज कंपनीचे अभियंता देशमुख यांनी सांगितले की, जिओ कंपनीच्या कार्यालयातील जनरेटर सुरु असल्यामुळे सदोष वायरींगने खांबावर वीज पुरवठा येत होता. त्यामुळे हा प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.