Congress criticism Pragya Satav
हिंगोली: काँग्रेसचे प्रभारी सचिन नाईक व साहेबराव कांबळे यांनी भाजप नेत्या प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेल्या टीकेला विलास गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. प्रभारींच्या पायगुणांमुळेच जिल्ह्यात काँग्रेसची वाट लागल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. दोघांनीही येत्या काळात काँग्रेस कशी वाढेल, याचे आत्मपरिक्षण करावे, आमच्या नेत्यांबद्दल सल्ला देऊ नये, अन्यथा जशास तसेच उत्तर देऊ, असा इशारा गोरे यांनी दिला आहे.
गोरे पुढे म्हणाले की, साहेबराव कांबळे यांनी हिंगोलीत लुडबूड न करता उमरखेडकडे लक्ष द्यावे, अगोदरच तिथे कांबळे यांच्या त्रासाला कंटाळून दोन माजी आमदारांसह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी हिंगोलीतील नेत्यांच्या पक्षप्रवेशाऐवजी आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षसंघटन मजबूत करून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणावे, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले.
सचिन नाईक यांच्यावर पक्षाच्या समन्वयाची जबाबदारी असताना त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत स्वतःसाठीच उमेदवारी मागत गटबाजीला प्रोत्साहन दिले. परिणामी, पक्षाची वाताहात झाल्याचा गंभीर आरोप गोरे यांनी केला.
दुसऱ्यांकडे बोट दाखवताना आपल्या दिशेने चार बोटे असतात, याचे भान देखील नाईक यांनी ठेवावे, असा टोला देखील गोरे यांनी लगावला. आगामी काळात काँग्रेसकडून निवडणुक लढवून आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान देखील केले. आम्ही आगामी सर्वच निवडणुकीत चार हात करण्यास तयार असल्याचे गोरे यांनी सांगितले.