Hingoli farmer news
शिरळी येथील शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे औताला भाऊ व मुलाला जुंपण्याची वेळ आली आहे.   Pudhari News Network
हिंगोली

दुर्दैव: बैल नसल्याने भाऊ अन् मुलगा जुंपला औताला

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील शिरळी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे त्याच्यावर औताला चक्क आपला भाऊ व मुलाला जुंपण्याची वेळ आली आहे. हा शेतकरी सध्या हळदीच्या लागवडीची तयारी करत आहे.

Summary

  • शिरळी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैल नाही

  • बैलजोडी देण्यासही कोणीही तयार नाही.

  • औताला चक्क आपला भाऊ व मुलाला जुंपण्याची वेळ

उदरनिर्वाह शेतीवरच चालतो.

अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांच्या नावे सुमारे अडीच एकर शेती आहे. पत्नी, मुलगा, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. याशिवाय मुलांचे शिक्षणही शेती व रोजमजुरीवर केले जाते. या शेतात विहीर देखील आहे. मागील २०-२५ वर्षांपासून ते शेती करतात. यापूर्वी शेती करताना बैलजोडी मागून पेरणी व इतर कामे करीत होते. त्या बदल्यास त्या शेतकऱ्याकडे मजुरीचे काम करावे लागत होते.

मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह करणे कठीण

मात्र, मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह करणे कठीण होत असल्याने पारंपरिक पिकांऐवजी त्यांनी विहिरीच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी हळद लागवडीचा निर्णय घेतला. मात्र, हळदीच्या बेडची कामे ट्रॅक्टरने होत नसल्याने त्यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली. त्यानंतर आता सर्वांच्याच पेरण्या राहिल्यामुळे बैलजोडी देण्यासही कोणी तयार नाही. त्यामुळे बैलजोडी साठी थांबल्यास पेरणी व लागवडीला उशीर होईल, त्यातून उत्पादनात घट होईल, यामुळे त्यांनी भाऊ व मुलास औताला जुंपले. तर मुलगा बाहेरगावी गेल्यावर नात्यातील एका मुलास सोबत घेऊन त्याला औतावर जूंपून हळदीसाठी बेडवर फुल्या पाडण्यास सुरवात केली आहे.

रोजमजुरीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह

दरम्यान, आता पाऊस झाल्यानंतर या बेडवर हळदीची लागवड करणार असल्याचे बालाजी पुंडगे यांनी सांगितले. अर्धा एकर शेतात हळद लागवड करणार असून उर्वरीत शेतीमध्ये सोयाबीन व इतर पिके घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेरणीची लगबग झाल्यानंतर रोजमजुरीच्या कामावर जात असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कसाबसा सुटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुलगा बारावी उत्तीर्ण, मुलगी उच्च शिक्षण घेतेय

सध्या मुलगा बारावी उत्तीर्ण झाला असून मुलगीही उच्च शिक्षण घेत आहे. दोघांनाही उच्च शिक्षण देण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. त्यासाठी मिळेल ते कष्ट करण्याची तयारी असल्याचेही पुंडगे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT