Kundkar Pimpiri bullock pair protest
औंढा नागनाथ: तालुक्यातील कुंडकर पिंपरी येथील रमाई व पंतप्रधान घरकुल आवास योजनेतील १३७ घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता जाणीवपूर्वक थांबवल्याने लाभार्थ्यांनी रोष व्यक्त करत आज (दि. १८) दुपारी दोन वाजता बैल जोडी सजवून हलगी वाजवत पंचायत समिती कार्यालयात फिरवली. गटविकास अधिकारी यांच्या कक्षासमोर बैलांना चारा टाकून बांधत अनोखे आंदोलन केले.
यावेळी गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्याकडे घरकुलाचे हप्ते प्रलंबित ठेवणाऱ्या अभियंत्यांची तात्काळ बदली करून घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी केली. यादरम्यान गटविकास अधिकारी यांनी अभियंताच्या बदलीचे आदेश काढून दोन दिवसांत घरकुलाचा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू होती. यावेळी अनिल कुंडकर, शेषराव कान्हे, देविदास कऱ्हाळे, यादव कान्हे, संदीप कुंडकर, रघुनाथ कऱ्हाळे, प्रकाश सावळे, मावंजीराव कुंडकर, शिवाजी कान्हे, दशरथ कुंडकर, अमोल कुंडकर, शामराव सावळे यांच्यासह लाभार्थी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.