Gram Panchayat Election Reservation Lottery AI
हिंगोली

Hingoli Gram Panchayat Reservation | औंढा तालुक्यातील ८८ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १२ जूनरोजी आरक्षण सोडत

पंचायत समितीत आढावा बैठक; हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा तहसीलदारांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Gram Panchayat Election Reservation Lottery

औंढा नागनाथ : ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील एकूण ८८ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीसंदर्भात पंचायत समिती सभागृहात विशेष आढावा बैठक घेण्यात आली. महसूल विभाग, ग्रामविकास विभाग तसेच कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना यावेळी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

मंगळवारी (दि. ९ ) औंढा पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस महसूल कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तालुक्यातील सर्व ८८ ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्याबाबत बैठकीत विशेष निर्देश देण्यात आले.

औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांनी आरक्षण सोडतीबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, दि. १२ जून रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत इतिवृत्तासह विहित नमुन्यातील अहवाल सादर करणे संबंधित कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक राहणार आहे.

आरक्षण प्रक्रियेची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचावी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर सूचना प्रसिद्ध कराव्यात किंवा दवंडी देऊन गावात कार्यक्रमाची घोषणा करावी, असेही निर्देश देण्यात आले.

या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. आरक्षण निश्चितीसाठी प्रत्येक ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अथवा कामात कचुराई खपवून घेतली जाणार नाही. निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदार हरीश गाडे यांनी दिला.

दरम्यान, तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT