वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागते. Pudhari
हिंगोली

Aundha Nagnath News | औंढा नागनाथ येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाकडे अधिकाऱ्यांची पाठ; उपचाराविना जनावरांची तडफड

पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये अधिकाऱ्यांची अनुपस्थिती शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath vet hospital news

औंढा नागनाथ : तालुक्यातील औंढा नागनाथ येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या केंद्रावर परिसरातील अनेक खेड्यांमधून शेतकरी आपली जनावरे घेऊन येतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांना उपचारासाठी ताटकळत बसावे लागते.

दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत पशुवैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्याचाच ठावठिकाणा नसल्याने इतर कर्मचारीही दिसून आले नाहीत. शेतकरी आपल्या बैल, शेळ्या, कुत्री अशा पाळीव व शेतीतील प्राण्यांना घेऊन आल्यावर केवळ कंपाउंडर उपस्थित असल्याचे समजले.

कंपाउंडरकडून अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक विचारला असता, “वरिष्ठांचे आदेश आहेत, तो कुणालाही देऊ नये” असे सांगण्यात आले. अगदी साधे औषध मागितले तरी कपाटाची किल्ली नसल्याने औषधही मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी व त्यांची जनावरे दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही परत जाण्यास भाग पडले.

या चिकित्सालयात दोन अधिकारी असल्याचे सांगितले जाते; परंतु ते नांदेड व परभणी येथून ये-जा करत असल्याची माहिती मिळाली. याशिवाय अनेक पदे रिक्त असल्याचेही समजते. दरम्यान, इंटर्नशिपसाठी आलेले विद्यार्थी गावोगावी जाऊन लसीकरण करतात. या लसीकरणासाठी शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा जास्त रक्कम मागितली जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

शेतकरी वर्गाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रिक्त पदे तातडीने भरावीत, तसेच कार्यरत कर्मचाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT