औंढा नागनाथ मंदिरात १६० ड्रोनचा नेत्रदीपक लेझर शो 
हिंगोली

Hingoli Mahashivratri : औंढा नागनाथ मंदिरात १६० ड्रोनचा नेत्रदीपक लेझर शो

महाशिवरात्री महोत्सवानिमित्त पर्यटक वृद्धीसाठी जिल्हा प्रशासनाचे विशेष प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

हिंगोली : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे असलेल्या औंढा नागनाथ मंदिर येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त १६० ड्रोनच्या भव्य लेझर शोचे आयोजन जिल्हा प्रशासन व मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा ड्रोन लेझर शो भक्त निवास क्र. ३ येथील मैदानावर सादर करण्यात आला.

यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहन, अपर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सेनगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेशकुमार मीना तसेच तहसीलदार हरिष गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा भव्य ड्रोन लेझर शो आयोजित करण्यात आला. औंढा नागनाथ मंदिर येथे पर्यटक व भाविकांसाठी निवास व्यवस्था, पायाभूत सुविधा व विकासकामांसाठी २८८ कोटींपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला या कामांचा सातत्याने आढावा घेत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर यावा व येथे पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सातत्याने प्रयत्नशील आहेत. ऐतिहासिक ड्रोन लेझर शोच्या माध्यमातून जिल्ह्याची ओळख देशभर पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.यापूर्वी सोमनाथ मंदिर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अशा स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आज औंढा नागनाथ मंदिर येथे या शोचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ड्रोन लेझर शोमुळे औंढा नागनाथ येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या २५ लाखांवरून ५० लाखांपर्यंत वाढेल, असा विश्वास आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचा व्यापक प्रचार व प्रसार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार संतोष बांगर व जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपस्थित सर्व भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT