हिंगोली

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यात जमा केलेला २ हजार ब्रास रेती साठा जप्त

स्वालिया न. शिकलगार

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा – वसमत उपविभाग अंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यात चार वाळू घाटावर जप्त करण्यात आली. सुमारे २ हजार ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत दिली जाणार आहे. त्यासाठी औंढा नागनाथ तहसील कार्यालयाने पंचायत समितीला पत्र देऊन घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाळू अभावी रखडलेले घरकुलांचे काम मार्गी लागणार आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये महसूल प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी पथके स्थापन केली आहेत. अवैधरीत्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर त्यांनी कारवाई सुरू केली आहे.

जिल्हाभरात मागील तीन दिवसात तब्बल ३० पेक्षा अधिक वाहनांवर कार्यवाही करण्यात आली असून या कारवाईमधून वाहन चालक आणि मालकावर कोट्यवधी रुपयांच्या दंडाची नोटिसा बजावण्यात आले आहेत. दंडाची रक्कम न भरणाऱ्या वाहन मालकाच्या सातबारावर बोजा चढविला जाणार आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील धार, माथा, रुपुर या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू साठा करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. यावरून उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी औंढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे, वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी आशा गीते, मंडळ अधिकारी मेहत्रे, पी आर काळे गोपाळ मुकीर, विठ्ठल शेळके, सुनील रोडगे, कोतवाल संदीप मुंडे यांच्या पथकाने या भागात जाऊन पाहणी केली. या परिसरात २ हजार ब्रास वाळू साठा असल्याचे आढळून आले.

वाळू साठा महसूल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला असून सदर वाळू घरकुल लाभार्थ्यांना शासकीय नियमानुसार मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी औंढा नागनाथ तहसील कार्यालयाने पंचायत समितीला पत्र पाठवून घरकुल लाभार्थ्यांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर तातडीने त्यांना वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. लाभार्थ्यांना बांधकामासाठी वाळू उपलब्ध होणार असल्याने घरकुलांची कामे होणार असल्याचे चित्र आहे तर शासकीय दरानुसार काही लाभार्थ्यांना या वाळूचा लाभ होणार आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही अधिक सतर्कपणे काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

SCROLL FOR NEXT