Hingoli Diesel Distribution
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी आणि वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात डिझेलचा तुटवडा जाणवत असून, शेती मशागतीसाठी लागणारे ट्रॅक्टर व अन्य यंत्रसामग्री ठप्प होण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
डिझेल उपलब्ध होताच पेट्रोल पंपांवर वाहनधारक आणि शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, औंढा नागनाथ येथील ओम पेट्रोल पंपावर गुरुवारी (दि. २१ मे २०२६) डिझेल उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली.
परिस्थिती हाताळण्यासाठी ओम पेट्रोल पंपाचे मालक विलास काळे यांनी पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिझेल वाटपाची व्यवस्था केली. पोलिसांच्या उपस्थितीत वाहनधारक आणि शेतकऱ्यांना एकाच रांगेत उभे करून शिस्तबद्ध पद्धतीने डिझेलचे वितरण करण्यात आले.
पोलीस प्रशासनाच्या देखरेखीखाली झालेल्या या व्यवस्थेमुळे कोणताही गोंधळ न होता रांगेतील सर्वांना सुरळीतपणे डिझेल मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.