Aundha Nagnath Temple Development Fund Approved
औंढा नागनाथ : देशातील आद्य आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १७८ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांना शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे मंदिर संवर्धनासोबतच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या विविध सोयी-सुविधांची कामेही मार्गी लागणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत विकास आराखड्याला आणि प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष कामांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०२६-२७ पासून या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराची विविध कामे केली जाणार आहेत. मंदिर आवारातील वास्तूंच्या संवर्धनासह नंदी मंडप आणि दर्शनबारीची कामे प्रस्तावित आहेत.
याशिवाय मंदिर परिसरातील हरिहर तलाव, कालिका माता मंदिर, दक्षिण व पश्चिम दिशेचे महादेव मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर, उत्तर दिशेचे महादेव मंदिर, मंदिराचा चौथरा, निळकंठेश्वर मंदिर, श्री विसोबा खेचर स्वामी मंदिर आणि चिंतामणी मंदिर यांचा विकास व संवर्धन करण्यात येणार आहे.
औंढा नागनाथ येथे दरवर्षी ५० लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मंदिराच्या संवर्धनासोबतच भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही या विकास आराखड्यात भर देण्यात आला आहे.
संपूर्ण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. मंजूर कामे निर्धारित कालावधीत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याची जबाबदारी या यंत्रणांवर राहणार आहे.
मंदिराचे पावित्र्य, ऐतिहासिक वारसा आणि वास्तूंचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून पुरातत्त्व विभाग तसेच बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे केली जाणार आहेत. त्यामुळे विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यातून औंढा नागनाथ मंदिर आणि परिसराचा कायापालट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.