औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा : येथील बस स्थानकात प्रवाशांवर पाळत ठेवून गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या दोन पाकीटमार महिलांना औंढा पोलिसांनी गजाआड केले. मंगळवारी तालुक्यातील अंजनवाडी येथील गजानन शिवराम कुटे यांनी बस मध्ये चढताना खिशातील ८ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरल्याची फिर्याद औंढा पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
या तक्रारीची तत्काळ दखल घेत औंढा पोलिसांनी येथील बस स्थानकातून चार संशयित महिलांना ताब्यात घेत तपासणी केली. त्यांच्याकडे गजानन कुटे यांच्या खिशातून चोरी गेलेल्या रोख ८ हजार रुपयांसह इतर सोने चांदीचे दागिने आढळून आले. पोलिस खाक्या दाखवताच दागिने इतरत्र चोरी केले असल्याचे त्या महिलांनी कबूल केले.
याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून न्यायालयात महिलांना हजर करण्यात असता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश राहिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वसीम पठाण करीत आहे.