मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, युवक आणि महिलांनी सहभाग घेतला. Pudhari
हिंगोली

Aundha Nagnath Morcha | औंढा नागनाथ येथे बौद्ध समाजाचा मोर्चा; जनगणनेत अनुसूचित जातीतील नोंद व उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी

समस्त सिद्धार्थ नगर नागनाथ आणि आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

Aundha Nagnath Baudha Samaj Morcha

औंढा नागनाथ : बौद्ध समाजाची जनगणनेत अनुसूचित जातीमध्ये नोंद करण्यात यावी तसेच अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२६) औंढा नागनाथ येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. समस्त सिद्धार्थ नगर नागनाथ आणि आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, युवक आणि महिलांनी सहभाग घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. सकाळपासूनच चौकात नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली होती. मोर्चेकऱ्यांनी बौद्ध समाजाची जनगणनेत अनुसूचित जातीमध्ये नोंद व्हावी आणि प्रस्तावित उपवर्गीकरण तातडीने रद्द करण्यात यावे, अशा घोषणा दिल्या.

सरकारला निवेदन सादर

मोर्चानंतर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार हरीश गाडे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या जनगणनेत बौद्ध समाजाची नोंद खुल्या प्रवर्गात केली जात आहे. मात्र, १९९० च्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार बौद्ध समाज अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असून त्यांच्याकडे वैध जात प्रमाणपत्रे आहेत. तरीदेखील चुकीच्या नोंदींमुळे राखीव जागांची संख्या कमी होत असल्याचा आरोप करण्यात आला.

जनगणना प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मोर्चेकऱ्यांनी जनगणना प्रक्रियेवरही आक्षेप घेत, अनेक ठिकाणी प्रगणक तोंडी माहितीच्या आधारे नोंदी करत असल्यामुळे माहितीमध्ये छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली. तसेच राज्य सरकार १९६१ च्या जनगणना आकडेवारीच्या आधारे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या तयारीत असल्याने बौद्ध समाजासह इतर घटकांवर अन्याय होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या

मोर्चादरम्यान पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या :

  • आगामी जनगणनेत बौद्ध समाजाची नोंद अनुसूचित जातीमध्ये करण्यात यावी

  • अनुसूचित जातींचे प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे

  • खुल्या प्रवर्गाचे स्वतंत्र सर्वेक्षण करून त्यामध्ये उपवर्गीकरण लागू करावे

  • महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंना ताब्यात देण्यात यावा

  • देवस्थान विश्वस्त मंडळांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व द्यावे

  • खुल्या प्रवर्गात राखीव उमेदवारांना बंदी घालणारा शासन निर्णय रद्द करावा

मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT