Hingoli Aundha Nagnath Farmer Death
औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. ही घटना सोमवारी (दि. २८) घडली. तानाजी विठोबा मोरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सततची नापिकी आणि पावसाअभावी हातातून जात असलेल्या सोयाबीन पिकामुळे ते चिंतेत असल्याची माहिती समोर आली आहे.
तानाजी मोरे यांच्याकडे गावशिवारात सुमारे चार एकर शेती होती. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्जही होते. यंदाच्या खरीप हंगामात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकांची अवस्था बिकट झाली होती. सोयाबीनचे पीक वाळून गेल्याने आर्थिक संकट अधिकच वाढले होते.
दरम्यान, मोरे यांनी शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध प्राशन केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने हिंगोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी २९ सप्टेंबर रोजी माधव संभाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी रोहिदास राठोड पुढील तपास करीत आहेत.
तानाजी मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.